जगातली चौथी अर्थव्यवस्था आणि आमची बोंबाबोंब.
सकाळी सकाळी
बातम्या ऐकत होतो. नीति आयोगाने
घोषणा केली कि भारत आता जगातील चौथी आर्थिक व्यवस्था बनला आहे. भारी आनंद झाला राव! इतक्यात घरातून आवाज आला, भाजी संपली आहे, आता आणली नाही तर बिना भाजीचे जेवण करावे लागेल. पर्याय नव्हता, उठलो आणि निघालो भाजी आणायला.
रस्त्यातच एक भाजीवाला गाडा भेटला. अंगावर फाटके कपडे, मरतुकडा जीव, भलामोठा गाडा हाकत फिरत होता. त्याच्याकडे पिशवीभर भाजी घेतली आणि विचारलं किती झाले भैय्या? त्याने मनातल्या मनात हिशोब केला आणि सांगितलं, ₹700/- साहेब. गाड्यावर एक नजर फिरवली आणि विचारल या गाड्यावरच्या संपूर्ण मालाची किंमत काय? उत्तर आल, ₹70,000 साहेब. त्याच्याकडे नखशिखांत नजर टाकत ओठावर आलेला प्रश्न विचारून टाकला, बाबा रे एवढे पैसे रोज कुठून आणतोस? त्याने सांगितलं, साहेब आडतीवर उचल मिळते. रोज सकाळी माल घ्यायचा, दिवसभर विकायचा नी संध्याकाळी अडत्याला पैसे परत करायचे, दुसऱ्या दिवसांसाठी उचल घ्यायची, परत माल उचलायचा आणि विकायचा. मला प्रश्न पडला, की आडत्याला रोज पैसे का दाखवायचे? त्याने सांगितलं, कि मी रोज मार्केटमध्ये आहे याची खात्री करण्यासाठी रोज त्याच्याकडे हजेरी द्यावी लागते. रोजच्या रोज व्याज काढून घेतो. म्हटल शाब्बास, पाकिस्तानला पैसे देऊन तो कुठे खर्च करतो हे न बघणार्या आयएमएफ पेक्षा, हा अडती अधिक हुशार आहे.
आता हिशोब केला, हां भाजीवाला रोज ₹50,000/- ची भाजी विकत घेतो, त्यातला पाच हजारांचं व्याज देतो, ₹70,000/- ची विक्री करतो, आणि ₹15,000 घरी घेऊन जातो. याची रोजची उलाढाल ₹1,25,000/-. म्हणजे माझ्या महिन्याच्या उत्पन्नाबरोबर. म्हणजे याची अर्थव्यवस्था माझ्यापेक्षा 30 पटींनी जास्त मोठी आहे. तरीही तो झोपडीत, उन्हातानात. मी त्याला उद्यापासून तुझी भाजी घेणार नाही म्हणून धमकी देऊ शकतो.
आता त्याच्या आणि माझ्या जीडीपीचा हिशोब, चड्डीवाल्या अर्थशास्त्रज्ञांनी करावा आणि जमल्यास स्वतःलाच समजावून सांगावा.
थोडा पुढे गेलो तर
नुकतेच बँकेतून रिटायर झालेले आणि स्वप्नातल घर बांधून त्यात आलिशान राहणारे गल्लीतलेच काका भेटले. त्यांनी मला सांगितले, माझा बंगला बिल्डरला दिला आहे, दोन फ्लॅट माझ्याकडे राहतील बाकी बिल्डर
विकणार आहे, तुम्हाला
इण्टरेस्ट असेल तर घ्याल का, मला चांगला शेजारी मिळेल. त्यांना विचारलं, काका तुम्ही निवृत्त आयुष्य मजेत घालवण्यासाठी आयुष्यभराची प्लॅनिंग करून हे घर बांधलेल. ते म्हणाले, घराचा टॅक्स आणि मेंटेनन्स मध्ये माझी अर्धी पेन्शन संपेल. वर पुण्यात राहणार्या पोराला, स्वतःचा फ्लॅट नसेल तर कोणी पोरगी देणार नाही. आता त्यांचा जीडीपीचा हिशोब केला. स्वतःच्या घरात राहून आयुष्य घालवत
असताना, त्यांची
अर्थव्यवस्था पेन्शनपुरती मर्यादित. आता येत्या वर्षात, बिल्डर त्यांच्याकडून पाच फ्लॅटची खरेदी खते करून
देणार, वरून दोन फ्लॅट
त्यांच्या नावे करून देणार, म्हणजे अर्थव्यवस्था झाली किमान रुपये 7,00,00,000/- ची. वरून पोरासाठी घ्यायच्या फ्लॅटचे रुपये 1,00,00,000/- म्हणजे यांची अर्थव्यवस्था रुपये 8,00,00,000/- हे बंगल्यातून फ्लॅटमध्ये राहायला जाणार. अर्थव्यवस्था भक्कम झाली की आजारी पडली, झिंग चढलेल्या अर्थतज्ञांनी जरा समजून सांगावे.
बरे त्या भाजीवाल्याच्या घरात चार पोरे, प्रत्येकजण 18 व्या वर्षी पंचर दुकान काढून स्वतंत्र. पेन्शनर काकांच्या घरचा एकमेव पोरगा अजूनही बेकार. थोडक्यात, स्टेशनवर चहा विकणारे आणि भजे तळणारे सगळे पोस्टग्रॅजुएट आमच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ. एवढी मजबूत अर्थव्यवस्था उभी करणे सोपे नाही राव.
आणि हो, 10 वर्षापूर्वी आमच्या अर्थव्यवस्थेचा कारभार, ₹50/- प्रती डॉलरनी व्हायचा. आकडा छोटा दिसायचा हो. आता आम्ही ₹100/- प्रती डॉलर विकत घेतो. आमची अर्थव्यवस्था मोठी झाली की नाही?
वाद करायचा नाही.
मोदी है, तो मुमकीन हैl