19 January 2024

VAKILSAHEB

राम सत्तेतलाराम सत्तेबाहेरचा.

 

मी पाटील, श्रीराम माझं दैवत.

पाटीलगढी कोसळलीयनग्न भग्न झालिय.

पण आजही कोसळलेल्या देवघरातील देव्हाऱ्यावर,

सत्तेचे प्रतीक असणारा कळस जपून ठेवलाय,

पुन्हा कधीतरी सत्ता येईल या आशेवर.

 

माझा राम, एक वचनी, एकपत्नी, एक बाणी.

माझा राम, पित्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी

वनवास पत्करणारा.

राजसेना हाताशी नसली म्हणून निराश न होता,

समाजाबाहेरच्या वनवासी मर्कटसेना, जटायू, जांबवंतसेनेला

हाताशी धरून अवघा समुद्र पार करत

आपल्या सीतेला, प्राणप्रियेला, परत मिळविणारा.

 

वनवासातला राम हा असा होता,

सर्वांना हवाहवासा होता.

 

वनवास संपला, राम राजा झाला.

आनंदी आनंद झाला!

वनवासी राम स्थिरस्थावर झाला.

जनतेला सोबत घेऊन चालला.

 

कुटुंब वत्सल राम जनतेचा झाला,

जनतेच्या नजरेत स्वतःला बसवायला लागला.

 

मग कोणी उपटसुंभ बोलला म्हणून,

सीतेचा त्याग करायलाही नाही कचरला.

दरबारी  भाटांचे महत्त्व कमी होईल म्हणून

शंबुकाचा वध करायलाही सरसावला.

धरती माय, पोटात घे,

म्हणून सीतेला विवश असाहाय्य करून गेला.

 

उच्चभ्रू समाज स्वार्थापुरता रामाचा होता,

वनवासी समाज रामानेच दूर लोटला होता.

रामाचा दरबार, राजवाडा, जन्मस्थळ लुटलं, उध्वस्त केलं,

तरीही रामाला देव बनवणारा दरबारी शांत, शांत होता.

 

परत एकदा वनवासी जागा झाला,

रामाला तो विसरला नव्हता.

गाव गाव जागा झाला, वीट वीट जमा झाली,

दलिताघरचा चौपाल समोर करून,

राम जन्मभूमीचा शिलाण्यास झाला.

अवघा हिंदू एक झाला,

 जात पात विसरून गेला.

 

पुढे रामभक्त सत्तेत आला

दलिताघरच्या चौपालाचा शिलाण्यास

सत्तेचा पाया ठरला.

राम जिंकला, सत्तेत आला.

चौपालाचा  शिलाण्यास तोकडा झाला!

 

राजा सरसावला, त्याने पुन्हा एकदा शिलाण्यास केला.

इथे वनवासी नव्हता सोबत,

होता तो संघाचा मुखिया!

आता रामाचा परत एकदा प्रतिष्ठापना सोहळा होतोय,

दलिता घरचा चौपाल पूर्ण विस्मरणात जातोय,

संघाचा मुखिया दिमाखात मिरवतोय!

 

प्रस्थापितांसाठी आरक्षणाचा बाजार मांडून

माणूस- माणूस लढवला जातोय.

मणिपूर जळले काय,

महाराष्ट्र पेटला काय,

आम्हाला कुठला फरक पडतोय?

 

अरे नाचा, अरे नाचा, दिवे लावा, दिवे!

आपला राजा प्रतिष्ठापना करतोय!

संघाचा मुखिया घोषणा देतोय

गर्व से कहो हम हिंदू है!

 

दलिताघरचा चौपाल असो

की धर्मप्रतिक शंकराचार्य,

त्यांच काय घेऊन बसले राव?

लक्षात ठेवा, आता राम सत्तेतला आहे,

 

जी हुजूर, जी सलाम,

आपला मात्र, मोठ्ठा राम-राम!!

 

भ्रमरमिलिंद @ मिलिंद पाटील